नरभक्षक बिबट्याची शोध मोहीम सुरुच; नेमबाजांना पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 3:45 PM
गर्भगिरीतील नरभक्षक बिबट्याचा शोध घेऊन त्यास बेशुद्ध करुन पकडण्यासाठी राज्यातील अनुभवी व विशेष कौशल्यधारक नेमबाजांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच शनिवारी दाखल झालेल्या पथकाला बिबट्याच्या पायांचे ताजे ठसे आढळून आले आहेत.
तिसगाव : गर्भगिरीतील नरभक्षक बिबट्याचा शोध घेऊन त्यास बेशुद्ध करुन पकडण्यासाठी राज्यातील अनुभवी व विशेष कौशल्यधारक नेमबाजांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच शनिवारी दाखल झालेल्या पथकाला बिबट्याच्या पायांचे ताजे ठसे आढळून आले आहेत.गत पंधरा दिवसात तालुक्यात तीन बालकांना बिबट्याने उचलून नेऊन ठार मारले. या बिबट्याच्या शोधासाठी उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी मढी येथील रोपवाटिकेत निवासी राहून शोध मोहिमेचे संचालन करीत आहेत. शनिवारी विशेष तज्ज्ञांचे चार पथके नव्याने दाखल झाले आहे. त्यांना शनिवारी सटवाई दरा भागात बिबट्याचे ताजे ठसे मिळून आले.जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके दाखल होताच त्यांनी तत्काळ शोध मोहिमेला सुरवात झाली आहे. संपूर्ण कार्यक्षेत्रात कर्मचारी व अधिकारी साधन सामुग्रीसह तात्काळ रवाना झाले. सर्च लाईट, नाईट मोड कॅमेरे, खोल दरीत उतरण्यासाठी अत्याधुनिक ट्युब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे, रेस्क्यु व्हॅन्स, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे, लाठ्या काठ्या, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्टी, वॉकी टॉकी सेट अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साधन सामुग्रीसह हंडाळवाडीपासून वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगररांगाचा निर्जन भागामध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत. आतापर्यंत बिबट्याने तीनही हल्ले रात्री केले असल्याने निशाचर बिबट्या समजून शोध मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.१८ पिंजरे लावलेपाथडी ठिकठिकाणी सध्या १८ पिंजरे लावले असून आवश्यकतेनुसार पिंजऱ्याची संख्या वाढविण्यासाठी इतर जिल्ह्यातून पिंजरे मागविण्यात आले आहेत.बिबटयाचे माग शोधणारी विशेष यंत्रणा यंदा प्रथमच वापरण्यात येत आहे.यात परिसरातील आदिवासी समाजाचे तीन युवक ही सहभाग नोंदवित आहेत. या मोहिमेत परिसरातील आदिवासींनाही सामावून घेण्यात आले आहे. वास, पावलांचे ठसे, अन्यप्राणी व पक्षांच्या हालचाली, पक्षांचे विशिष्ट आवाज याचाही उपयोग केला जात आहे. येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश शिरसाट यांचे पथकातील कर्मचारी मायंंबा परिसरातील माथ्यापासून पायथ्यापर्यंत विशेष साधन सामुग्रीसह शोध मोहीम सुरू आहेत.