अकोले : ऐतिहासिक शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिनी अकोलेत शेतकरी श्रमिकांनी शनिवारी मोर्चा काढून वंचितांचे प्रश्न ऐरणीवर आणले.१ जून २०१७ रोजी दोन वषार्पूर्वी पुणतांब्यातून शेतकरी संप सुरु झाला होता. संपाच्या दुस-या वर्धापन दिनाला किसान सभेने राज्यभर ग्रामीण महाराष्ट्रातील सर्व श्रमिकांच्या ज्वलंत प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी अकोलेत शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार, कर्मचारी, विद्यार्थी, युवक व महिलांच्या प्रश्नांना घेऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.वसंत मार्केट येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. भर उन्हात हजारो श्रमिकांनी शहरातून घोषणा देत मोर्चाने तहसील काचेरी गाठली तेथे पोहचल्यावर विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. शेतक-यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, शेतीमालाला दीडपट भाव मिळावा, ग्रामीण भागात मागेल त्याला रोजगार हमीचे काम मिळावे, सर्व बेघरांना घरकुल मिळावे, घरकुलांच्या यादीत सर्व वंचितांचा समावेश व्हावा, बांधकाम कामगारांची प्रलंबित प्रकरणे मंजूर करावीत, वन जमिनी कसणारांच्या नावे कराव्यात, वन जमिनीवरून आदिवासींना हुसकावून लावण्याचे कारस्थान बंद करावे, आशा कर्मचा-यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, या मागण्या करण्यात आल्या.डॉ.अजित नवले, कॉ. सदाशिव साबळे, कॉ. नामदेव भांगरे, कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. साहेबराव घोडे, कॉ. ज्ञानेश्वर काकड, कॉ. सारंगधर तनपुरे, कॉ. नंदू गवांदे, जुबेदा मणियार, आराधना बो-हाडे, पांडुरंग भांगरे, राजू गंभिरे, शिवराम लहामटे, दामू भांगरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिन : अकोलेत मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 6:31 PM