राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याला असलेल्या लिकेजचा सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खाते अतिथीगृहात झालेल्या बैठकीत उन्हाळी आवर्तन पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रविवारपर्यंत ६ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात आले आहे. आवर्तन ४७ दिवस सुरू असूनही पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टेलच्या ५०० हेक्टर क्षेत्र अद्याप ओलिताखाली आणायचे आहे. आवर्तनाला गॅप न दिल्याने ६५० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार आहे. उजवा कालव्याचे आवर्तन २० मार्चला सुरू केले होते. दुसºया उन्हाळी आवर्तनासाठी चार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात येणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. बैठकीला मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सूचना केल्या. बैठकीस खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, महावितरणचे कार्य अधीक्षक अभियंता सांगळे, सायली पाटील आदी उपस्थित होते.
मुळा धरणातून उद्यापासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 3:30 PM