अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. परंतु नवीन संचालक निवडतानाही दुसऱ्या पिढीला प्राधान्य दिले गेले असून, जिल्ह्यातील जगताप, काळे, राळेभात आणि भांगरे कुटुंबाची दुसरी पिढी यानिमित्ताने बँकेत दाखल झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडताना नवीन चेहरा की अनुभव, यापैकी कोणता निकष लावला जातो, याची जिल्ह्याला उत्सुकता आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात अमोल राळेभात, विवेक कोल्हे, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे हे पहिल्यांदा संचालक म्हणून निवडून आले आहेत. प्रशांत गायकवाड वगळता इतर नऊ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप हे बँकेचे संचालक राहिलेले आहेत. तसेच राहुल जगताप मागील पाच वर्षे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार होते. राहुल जगताप यांच्याकडे सध्या कोणतेही पद नसल्याने त्यांना संधी दिली गेल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीचे अशुतोष काळे हे आमदार आहेत. ते बिनविरोध निवडून आले आहेत. प्रशांत गायकवाड हे पहिल्यांना निवडूण आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील पूर्वी संचालक नव्हते. कोपरगावचे विवेक कोल्हे यांचे वडील बिपीन कोल्हे हे मागील संचालक मंडळात होते. महिला राखीवमधून राष्ट्रवादीने अशा तापकीर यांना संधी दिली. दुसऱ्या महिला संचालिका अनुराधा राजेंद्र नागवडे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तसेच अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभपती होत्या. त्यांचे पती राजेंद्र नागवडे हे मागील संचालक मंडळात तज्ञ संचालक होते. अशोक भांगरे यांचे वडील यशवंत भांगरे हे बँकेचे संचालक राहिलेले आहेत. अशोक भांगरे यांच्या रुपाने भांगरे कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीचा बँकेत प्रवेश झाला आहे. संगमनेरचे गणपत सांगळे हे प्रथमच संचालक झाले आहेत. अशा संचालकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच असून, यामध्ये कानवडे, तापकीर, सांगळे, गायकवाड यांचा समावेश आहे.
....
तीन अध्यक्ष झाले पुन्हा संचालक
सेनेचे मंत्री शंकराराव गडाख, भाजपाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि सीताराम गायकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहे. हे तिघे पुन्हा संचालक म्हणून निवडून आले आहेत.
...
तीन आमदार झाले संचालक
जिल्हा बँकेत भाजपच्या आमदार मोनिका राजळे, अशुतोष काळे, मंत्री शंकरराव गडाख हे संचालक झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत प्रथमच तीन आमदार संचालक झाले आहेत.
.....
हे संचालक पुन्हा बँकेत
अध्यक्ष सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, शिवाजीराव कर्डिले, उदय शेळके, मोनिका राजळे, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले, करण ससाणे हे मागील पाच वर्षे संचालक होते. ते पुन्हा संचालक झाले आहेत. मंत्री गडाख व भानुदास मुरकुटे पूर्वी संचालक होते. ते पुन्हा संचालक झाले आहेत.
....
बँकेतून हे पडले बाहेर
जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ यांच्यासह जगन्नाथ राळेभात, बिपीन कोल्हे, यशवंतराव गडाख, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब शेळके, आमदार अरुण जगताप, चैताली काळे, मीनाक्षी साळुंके, वैभव पिचड, सुरेश करपे, बाजीराव खेमनर, पांडुरंग अभंग, राजेंद्र नागवडे हे बँकेतून बाहेर पडले आहेत.