श्रीगोंदा : वाहनाच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याची बतावणी करुन चोरट्याने श्रीगोंदा शहरात एका जणास ८० हजार रुपयांना लुटले. नवनाथ नाना तांबवे यांच्या चार चाकी वाहनातून घरी जात असताना एकाने पाठलाग करत तुमच्या वाहनाच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याची थाप मारली. तांबवे खाली उतरलण्यानंतर भामट्याने ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली.ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गांधी पेट्रोल पंपाजवळ घटना घडली. नवनाथ तांबवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.नवनाथ तांबवे यांनी सोमवार (दि.२०रोजी) दुपारी एक वाजता बँकेतून ८० हजारांची रक्कम काढून ते टाटा इंडिका कारमध्ये ही रक्कम, दोन चेकबुक व एटीएम ठेवले. त्या ठिकाणावरून तांबवे काही अंतरावर गेले असता एका अनोळखी इसमाने तांबवे यांना आवाज देत तुमच्या गाडीच्या बोनेटमधून आॅईल गळत असल्याचे सांगितले. त्यामुळे तांबवे यांनी खाली उतरून पाहणी केली. तेव्हा त्यांना आॅईल गळत नसल्याचे दिसले. ते पुन्हा गाडीत येउन बसले तेव्हा त्यांना ८० हजारांची रक्कम,दोन चेकबुक व एटीएम गायब झाल्याचे दिसले. त्यावर त्यांनी संबंधित व्यक्तीचा आजूबाजूला शोध घेतला असता तो दिसला नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.गेल्या आठवड्यात हिरडगाव येथील सेवा निवृत्त शिक्षक यांनी बँकेतून ७० हजार काढले होते. त्यांच्या मोटरसायकलवर पाळत ठेवून ही रक्कम लंपास केली होती.
८० हजार रुपयांना एकास लुटले, श्रीगोंदा शहरात आठवड्यात दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 1:44 PM