केडगाव : स्वाईन फ्लूची लागण होऊन नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, अकोळनेर येथील शिक्षक प्रा.यशवंत उर्फ बंडू दत्तात्रय धामणे (वय ४९) यांचे नुकतेच पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. नगर तालुक्यातील एकाच आठवड्यात स्वाईन फ्लूचा हा दुसरा बळी आहे.प्रा. धामणे यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाल्यावर त्यांना उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे १७ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचाराचा खर्च मोठा असल्याने ग्रामस्थांसह रयतच्या विविध शाखांमधील शिक्षक व कर्मचा-यांनी मदत निधीही जमा केला होता. मात्र उपचार सुरु असताना शनिवार (दि.६) पासून त्यांची प्रकृती ढासळली आणि बुधवारी (दि.१०) दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, २ बंधू, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी १ मुलगी असा परिवार आहे.प्रा. धामणे यांच्याच बरोबर अकोळनेर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात काम करणारे कर्मचारी नितीन सदाशिव गायकवाड(दि.५०) यांना ही स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात स्वाइन फ्लूवर उपचार सुरु असताना मागील रविवारी (दि.७) हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालेले आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात नगर तालुक्यात एकाच शाळेत काम करणा-या दोघांचा स्वाईन फ्लूमुळे दुदैर्वी मृत्यू झाला आहे.
नगर तालुक्यात स्वाईन फ्लूचा दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 5:11 PM