अहमदनगर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाल्याने यंदाही साधेपणाने रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे.
ईदनिमित्त बाजारपेठेत असणारा खरेदीचा उत्साह व यातून होणारी मोठी आर्थिक उलाढाल यंदाही ठप्प आहे. रमजान महिन्यात टरबूज, खरबूज व इतर फळांना मोठी मागणी असते. यंदा कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनमुळे या वस्तूंची खरेदी व विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. मुस्लीम समाजात धार्मिकदृष्ट्या रमजान महिना व ईदचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात महिनाभर उपवास करून ईश्वराची सेवा केली जाते. सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी इफ्तार पार्टीचे आयोजन होते. बाजारपेठेतही खरेदीसाठी मुस्लीम बांधवांची मोठी लगबग असते. कोरोनामुळे मात्र गेल्या दोन वर्षांपासून साधेपणाने ईद साजरी होत आहे. रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांच्या घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले व इतर गोडधोड पदार्थांची मेजवानी असते. हे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठीही यंदा मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी सुसंवाद बैठका घेत घरीच रमजान ईद साजरी करण्याचे मुस्लीम बांधवांना आवाहन केले आहे. या आवाहनाला मुस्लीम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
...............
कोरोनामुळे सर्वत्र संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. मुस्लीम बांधवांनी यंदा घरीच थांबून रमजान ईद साजरी करावी, नियमांचे पालन करावे.
- उबेद शेख, सामाजिक कार्यकर्ते