श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने अधिकाराचा गैरवापर करुन स्वत:चीच वेतनवाढ केली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी संचालक मंडळाला नोटीस बजावली आहे.
सचिव दिलीप डेबरे यांनी अधिकाराचा गैरवापर करून दरमहा ६ हजार ३०० स्वत:ची वेतनवाढ केली. पुन्हा ती बंद केली. याबाबत बाजार समितीचे संचालक उमेश पोटे यांनी या संदर्भात तक्रार केली होती.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी त्यावर दोन्ही बाजूंची पडताळणी केली. डेबरे यांनी संचालक मंडळाची मान्यता न घेता स्वत:ची वेतनवाढ कशी केली? ही गंभीर बाब आहे. ३० दिवसात अनुपालन अहवाल पाठवावा अन्यथा संचालक मंडळाच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
माझा पगार इतर बाजार समिती सचिवाच्या तुलनेत कमी होता. सर्व बाबींचा विचार करून ६३०० रुपये दरमहा पगारवाढ केली. पण एक रुपयाचा वाढीव पगार घेतलेला नाही. पगारवाढीस संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे हे आरोप खोटे आहेत, असे समितीचे सचिव दिलीप डेंबरे यांनी सांगितले.