अहमदनगर : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह ६००जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अद्याप या आरोपींना अटक तर केली नाहीच, परंतु आता गुन्ह्यातील सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा (३०८ कलम) पोलिसांनी वगळला आहे. त्याऐवजी ‘किरकोळ दगडफेक’ (कलम ३२४, ३३६, ३३७) असा उल्लेख असणारी कलमे वाढविण्यात आली आहेत.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी या परिसरात दगडफेक केली, तसेच पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान केले. आरोपींच्या अटकेसाठी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला, शिवाय पंचनामान्यासाठी पोलिसांना मृतदेहाजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी दि. ९ एप्रिल रोजी शिवसेनेच्या ६०० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, नगरसेवक सचिन जाधव, योगिराज गाडे, विक्रम राठोड, हर्षवर्धन कोतकर यांच्यासह ६०० जणांचा समावेश आहे.पथकाने आतापर्यंत तपास करून काही नागरिकांकडे चौकशी केली. परंतु यात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, असे आढळून आल्याने ३०८ कलम वगळण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत आरोपींचे अटकसत्र सुरू होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.हे कलम वगळल्याने शिवसैनिकांना दिलासा मिळाला आहे़
शिवसैनिकांवरील ३०८ कलम वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 6:03 AM