अहमदनगर : जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. यामुळे शेतकर्यांकडून जास्तीत जास्त हे बियाणे उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बचत गटाकडून सोयाबीन बियाण्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या बचत गटांनी आतापर्यंत ५ हजार १९१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी आणि पशू संवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी दिली. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या सभेत खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ४ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रगृहीत धरण्यात आलेले आहे. यासाठी ६२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यात कपाशीचे ४ लाख ८० हजार पाकिटे यांची मागणी नोंदविण्यात आलेली असून त्यापैकी ३ लाख २७ हजार पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. हंगामासाठी २ लाख ५५ हजार मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली असून त्यापैकी २ लाख ५ हजार मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले असून ३५ हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा झालेला आहे. सभेत या वर्षीसाठी ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी, प्लस्टिक क्रेटस्, पॉवर स्पे्र पंप, सोलर कंदील, ताडपत्री या व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली. सभेला सदस्या पुष्पा रोहोम, जयश्री दरेकर, सुनीता भांगरे, पद्मा थोरात, सोनाली बोराटे, अंजली बोंबले, अंजली काकडे, कारभारी जावळे, निवास त्रिभुवन, शारदा भिंगारदिवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकरी बचत गटातर्फे बियाण्याचे सर्वेक्षण
By admin | Published: May 15, 2014 11:04 PM