अहमदनगर : पर्यावरण संवर्धनासाठी पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील डोंगर माथ्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून (सीड बॉम्बिंग) १ लाख वृक्ष बियांचे रोपण करण्यात येणार आहे़ १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे़माजी आमदार नवनाथ आव्हाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोहरी ग्रामपंचायत व चाणक्य चॅरिटी ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यात प्रथमच असा प्रयोग राबविण्यात येत आहे़ मोहरी गाव परिसरात लांबवर विस्तारलेल्या डोंगररांगा आहेत़ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तंत्रशुद्धरित्या ९ किलोमीटर अंतरावर बियाणे खाली सोडण्यात येणार आहेत़ सध्या पावसाळा असल्याने या बियांचे रोपण होते़ डोंगरावर रोपण केल्याने या वृक्षांना जनावरांपासून धोका नसतो़वृक्षतोडीमुळे विविध ठिकाणचे माळरान व डोंगर उजाड झाले आहेत़ यामुळे पर्यावरणाचा मोठा ºहास झाला आहे़ निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मोहरीचे सरपंच कल्पजित डोईफोडे व विशेष लेखापरीक्षक नवनाथ ठोंबरे यांनी सांगितले़ या कार्यक्रमाला आसाम मंत्रालयातील सचिव नितीन खाडे, आदिनाथ महाराज शास्त्री, उद्योजक गिरीश आव्हाड आदी उपस्थित राहणार आहे़हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच कल्पजित डोईफोडे, उपसरपंच रोहिदास नरोटे, विशेष लेखापरीक्षक नवनाथ ठोंबरे, सहायक लेखाधिकारी आश्रू नरोटे, अॅड़ जबाजी खडके, सुभाष हंडाळ, अमोल धाडगे, देविचंद नरोटे, आयुब खान, अजिनाथ डोईफोडे, नवनाथ नरोटे यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत़
लई भारी... हेलिकॉप्टरमधून 'सीड बॉम्बिंग'; डोंगरमाथ्यावर १ लाख वृक्षांचं बीजारोपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 15:24 IST