टाकळी ढोकेश्वर : वाळू उपसा करणारा जेसीबी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी रात्री पकडला होता. हा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात आणून लावला होता. गुरुवारी पहाटे अज्ञात चार वाळू तस्करांनी हा जेसीबी पळविला आहे.पारनेर तालुक्यातील काळू नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांना मिळाली होती. त्यानुसार वनकुटे येथील वाळू तस्कराकडून गेल्या वर्षापासून वाळू उपशासाठी वापरलेले जेसीबी बुधवारी रात्री तहसीलदार ज्योती देवरे यांनी पकडला. रात्री उशीर झाल्याने हा जेसीबी टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात रात्री १२ वाजता आणून लावला होता. परंतु गुरूवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या गेटचे कुलूप तोडून चार अज्ञात वाळू तस्करांनी हा जेसीबी घेवून पलायन केले असल्याची माहिती समजली आहे. वाळू तस्करांनी हा जेसीबी पळविल्याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी दुजोरा दिला आहे. याबाबत जेसीबी मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे तहसीलदार देवरे यांनी सांगितले.विश्रामगृहातील पेव्हिंग ब्लॉकचे नुकसान जेसीबी पळवून नेताना या विश्रामगृहातील फरशा व पेव्हिंग ब्लॉकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केअरटेकर शिंदे यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील मुळा, मांडओहोळ, काळू नदीपात्रात अवैध वाळू उपसा विरोधात धडक कारवाई सुरू केली असताना वाळू तस्करांनी थेट कारवाईतील वाहने पळविल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जप्त केलेला जेसीबी वाळू तस्करांनी पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 1:06 PM