कोपरगाव : कोरोना वैश्विक महामारीत रक्ताची नाती दुरावली. कोरोनात संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्त्वाची असल्याचे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे स्थानिक, ग्रामविकास निधीतून २० लाख, तर नव्याने होत असलेल्या २५ लाख रुपये खर्चाच्या सामाजिक, सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी कोविड योद्ध्यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठान, उद्योग समूह व धामोरीवासीयांच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रारंभी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी व अशोक भाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी सरपंच राहुल वाणी व उपसरपंच प्रभाकर मांजरे यांनी कोल्हे यांच्या विकासकामांची माहिती दिली. धामोरी येथे कोपरगाव बाजार समितीचे उपकेंद्र व्हावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी उपसभापती वैशाली साळुंके, कोल्हे कारखान्याचे संचालक मनेष गाडे, बाजीराव मांजरे, सुनील वाणी, सोमनाथ चांदगुडे, विजय जाधव, पोलीस पाटील संगीता ताजणे, प्रकाश वाघ, माजी उपसरपंच बाळासाहेब अहिरे, पांडुरंग पगार, विश्वास गाडे, खंडेराव पगार उपस्थित होते. कोरोना योद्धे बाळासाहेब अहिरे व बाबासाहेब गांगुर्डे यांनी अनुभव सांगितले. भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निहाल शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी उपसभापती वैशाली साळुंके यांनी आभार मानले.