नेवासा : नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या नवगतांचे स्वागत फुगे व मास्क देऊन करण्यात आले. यावेळी प्रवेशोत्सवासाठी तयार केलेला सेल्फी पॉइंट चिमुकल्यांसह पालकांच्या आकर्षणाचा विषय ठरला.
प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम यावर्षी राबवत प्रवेशोत्सव सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला. या सेल्फी पॉइंटद्वारे ‘माझी शाळा... माझे कुटुंब... माझी जबाबदारी,’ असा संदेश याद्वारे दिला. सेल्फी पॉइंटमध्ये फोटो घेण्याचा मोह शिक्षक व पालकांना आवरता आला नाही. मुख्याध्यापक राजेंद्र चापे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले.
यावेळी सरपंच अर्चना सुडके, उपसरपंच सोनाली गाडेकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेले फुगे व सेल्फी पॉइंटमध्ये काढलेला फोटो याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
शाळेतील शिक्षक जयश्री कोल्हे, सुनीता कर्जुले, शीतल झरेकर, दयानंद गाडेकर, अमोल गांगर्डे, नलिनी काकडे, नूतन जोशी, कल्पना धनावत, वर्षा भांबिरे, अश्विनी बोरकर या शिक्षकांनी प्रवेशोत्सवासाठी प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना वर्गपूर्व तयारी स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप केले. यावेळी प्रवेशोत्सव कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राजेंद्र सुडके, संदीप सुडके, विजय पंडुरे, नितीन भालेराव, प्रभारी केंद्रप्रमुख संतोष ढोले आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
............
१५ नेवासा स्कूल