अहमदनगर: महाविकास आघाडीचा धर्म पाळत अहमदनगर महापालिकेत सेना-राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. महापौरपदी सेनेच्या रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. ऑनलाईन सभा घेऊन निवडीची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत सकाळी अकरा वाजता ऑनलाईन सभा झाली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सभेचे कामकाज पाहिले. महापौर पदासाठी सेनेकडून रोहिणी शेंडगे यांचे चार, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले यांचे तीन, अशी सात नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. महापौर पदासाठी शेंडगे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सभागृहात जाहीर केले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी झाली. उपमहापौर पदासाठीदेखील राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा बोलाविण्यात आली होती. त्यामुळे सभागृहात फक्त उमेदवार उपस्थित होते. उपमहापौर पदासाठी शेंडगे व भोसले यांचा अनुक्रमे प्रत्येकी एक अर्ज दखल झाला होता. काँग्रेसने महापौर-उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज घेतले होते. परंतु, शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. महापालिकेत भाजपचे १५ नगरसेवक आहेत. परंतु, भाजपकडे महापौरपदासाठी उमेदवार नव्हता. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही भाजप तटस्थ होते. त्यामुळे महापौर व उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधकांकडून उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही.
.....
निवडीनंतर स्वतंत्र जल्लोष
महापालिकेत सेना-राष्ट्रवादी महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी एकत्र आले. वरिष्ठांच्या आदेशाने हे दोन्ही पक्ष एकत्र आले खरे; पण निवडीनंतर दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुलाल, फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. त्यामुळे महापालिकेतील ही एकी पुढे कोणते वळण घेते, याचीच नगरकरांना उत्सुकता आहे.
--
फोटो