श्रीगोदा/जामखेड/कर्जत : प्रत्येक तालुक्यात लोणीची २०० ते ३०० जणांची यंत्रणा फिरत आहे. त्यांना तीन महिन्यांपासून पगार नाहीत, ते येथे मतदारांची विचारपूस करतात. त्यांचेच बरे चालले आहे का?, हे त्यांनाच विचारा. लोणीची ही यंत्रणा परत पाठवा. नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. हे ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीत दोघांमध्ये तिसरा स्वतंत्र पॅनेल तयार करतील, अशी टिका काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी केली.थोरात यांनी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी श्रीगोंदा, जामखेड, कर्जत येथे सभा घेतल्या. या सभांमध्ये त्यांनी विखे कुटुंबीयांवर टिकास्त्र सोडले.ते म्हणाले, माजी खासदार बाळासाहेब विखे व त्यांच्या कुटुंबीयांना खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद अध्यक्षपद दोन वेळा दिले. पण एकवेळ थोडे बाजूला केले की, यांचे रूप पक्षाला पाहायला मिळते. उमेदवारी लढविणाऱ्यांची भाषा कशी शांत असली पाहिजे. पण या मुलाची भाषा पाहून घेऊ, बघू अशी उध्दट आहे. आमचा संसार करण्यास आम्ही सक्षम आहोत. तिसऱ्याचे इथे काम नाही. याचा आम्हाला अनुभव आला आहे. त्यामुळे यांना परत पाठवा. यावेळी जिल्हाध्यक्ष करण ससाणे, राजेंद्र नागवडे, तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, रमेश आजबे, राहुल उगले, सावरगावचे सरपंच दादासाहेब ढवळे, ज्योती गोलेकर, विष्णू गंभीरे, जमीर सय्यद आदी उपस्थित होते.अहमदनगर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे निवडणूक प्रचारप्रमुख राजेंद्र नागवडे, जि.प. सभापती अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, दादासाहेब मुंडे, प्रशांत दरेकर, संजय डाके, ऋषिकेश भोयटे, भोस आदींची यावेळी भाषणे झाली. अॅड. अशोक रोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार राहुल जगताप, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, घनश्याम शेलार, धनसिंग भोयटे आदी उपस्थित होते. अॅड. सुनील भोस यांनी आभार मानले.
Lok Sabha Election 2019 : लोणीची यंत्रणा परत पाठवा : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 4:25 PM