कोपरगाव (जि. अहमदनगर) : येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकुमार भाऊलाल गंगवाल ऊर्फ सी. बी. गंगवाल (वय ७८) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी (दि. २३) सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर कोपरगावात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दिवंगत गंगवाल यांनी जवळपास ४८ वर्षे बातमीदारीचे काम केले. या कार्यकाळात त्यांनी दैनिक लोकमतसह इतरही वृत्तपत्रांचे वार्ताहर म्हणून काम केले. कोपरगाव शहर व तालुका विकासात पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या लेखनीतून आवाज उठवला. शेती, सहकार, समाजकारण, राजकारण, पाणी, शैक्षणिक, संस्कृतिक या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील विविध पुरस्कारांसह जीवनगौरव पुरस्कारही मिळाले आहेत. कोपरगाव नगरपरिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांना ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांचा सहवास लाभला. येथील चिंतामणी औषधालयाचे मालक जितेंद्र गंगवाल यांचे वडील, तर वृत्तपत्र छायाचित्रकार कैलास गंगवाल यांचे ते भाऊ होत. गंगवाल यांच्या निधनाबद्दल लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटोरियल इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी शोक व्यक्त केला आहे.