पिंपळगाव माळवी : सध्या देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे मागील आठवड्यापासून राज्याच्या विविध भागातून आलेल्या ग्रामस्थांनी माहिती आरोग्य विभागाने एकत्र केली आहे. गावात ८६ व्यक्ती पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध भागातून आलेले आहेत. पिंपळगाव माळवी उपप्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अशा व्यक्तींचे विलगीकरण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्का मारून त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. त्यांना घरातील इतरांपासून स्वत:ला वेगळे ठेवण्याबद्दल मार्गदर्शन केले जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विलगीकरण हा एक उत्तम पर्याय आहे. या विलगीकरण कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मंगल राहिंज, आरोग्य सेविका मीना ससे, रुपाली साळवे, आशा सेविका शोभा ठाणगे, स्वाती झिने, मनीषा बनकर, लता झिने, उषा डाडर प्रयत्नशील आहेत.
पिंपळगाव माळवी परिसरामध्ये ८६ व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांना कोरोना विषाणूबाबत घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. विलगीकरणासाठी ग्रामस्थांकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे, असे आरोग्य सहाय्यिका मंगल राहिंज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.