कोपरगाव : शहरासह तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातच कोपरगावातील सर्वच कोरोना सेंटर हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.
ग्रामीण भागातील बाधित व्यक्तीसाठी ज्या-त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करावे, अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनुराग येवले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येवले म्हणाले की, ज़िल्हा परिषद शाळेचा उपयोग करून तेथे विलगीकरण कक्ष सुरू करून वाढती रुग्णसंख्या रोखता येऊ शकते. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले ग्रामीण भागातील व्यक्ती मोकाट फिरतात, त्यामुळे त्यांच्यापासून इतरांना कोरोनाची बाधा होत आहे. सद्यपरिस्थितीत बाधित रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत. तर संपर्कात आलेल्या व्यक्तींनादेखील कोठे ठेवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशासेविका यांची मदत घेऊन कुठलाही नवीन खर्च न करता फक्त बेड देऊन जिल्हा परिषद शाळा यांचे रूपांतर विलगीकरण कक्षात करता येईल. त्यामुळे असे रुग्ण गावातच राहतील. त्यांना जेवणही घरूनच मिळेल. तोही खर्च वाचेल.