स्टार १२०२
श्रीरामपूर : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मुदत संपलेले लर्निंग लायसेन्स, फिटनेस प्रमाणपत्र या कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. वाहनांच्या फिटनेस तपासणीकरिता एका निरीक्षकांची जादा नियुक्ती करण्यात आली असून लायसेन्ससाठीही तालुक्यांमध्ये शिबिरे घेतली जात आहेत. मात्र तरीही या तारखेपर्यंतचा कोटा फुल झाल्यामुळे अनेकांचे लायसेन्स बाद होण्याची भीती सर्वसामान्यांना सतावत आहे.
कोविडचे संकट व लॉकडाऊनमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला कार्यक्षेत्रातील सहा तालुक्यांमध्ये पुरेशा प्रमाणावर शिबिरे घेता आली नाहीत. त्यातच प्रत्यक्ष कार्यालयामध्ये लायसेन्सकरिता दररोज केवळ ८० जणांना वेळ दिली जाते. फिटनेस प्रमाणपत्राकरिताही स्थिती वेगळी नाही. तेथे दररोज ६० गाड्यांनाच वेळ मिळते. आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी कोटा फुल होऊन अनेकांचे लायसेन्स पक्के होण्यापूर्वीच बाद होण्याची भीती आहे. वाहनांच्या फिटनेसबाबतही तीच शक्यता व्यक्त होत आहे.
---------
रोजचा कोटा
लायसेन्सचा दररोज कोटा : ८०
फिटनेस प्रमाणपत्र : ३०
---------
काय आहेत अडचणी?
१) वाहनांच्या फिटनेस तपासणीकरिता तीन निरीक्षकांची नियुक्ती करायला हवी. प्रत्येक निरीक्षकाने ३० वाहनांची तपासणी केली तर दररोज ९० वाहनांची कामे पूर्ण होऊ शकतात. मात्र तसे होत नाही.
२) प्रत्येक तालुक्यामध्ये नियमित शिबिरे घेतली पाहिजे. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील लायसन्सचा ताण कमी होऊन कामे सुरळीत पार पडतील. मात्र शिबिरांची संख्या अपुरी पडत आहे.
---------
यापूर्वीही लायसन्स व फिटनेस प्रमाणपत्रांकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे लायसन्स अथवा फिटनेस प्रमाणपत्र बाद होण्याची भीती नाही. फिटनेसकरिता एका जादा निरीक्षकांची नियुक्त केली आहे. त्यामुळे दररोज ६० गाड्यांची तपासणी केली जात आहे. लायसेन्ससाठी दररोज ८० चा कोटा करण्यात आला आहे.
- गणेश डगळे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर.
--------
कारखान्यांचा गाळप हंगाम तोंडावर
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे ट्रकच्या फिटनेस तपासणीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वीच अपॉइंटमेंट घ्यावी व ऐनवेळी प्रयत्न करू नये, असे आवाहन गणेश डगळे यांनी चालकांना केले आहे.
------------