अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर थेट आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. ही हत्या १८ एकराच्या भूखंड प्रकरणातून झाल्याचा आरोप कर्डिले यांनी केला आहे. राज्यमंत्री तनपुरे हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित भूखंड तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित असून, या भूखंडाबाबत पत्रकार दातीर यांनी कायदेशीर लढा सुरू केला होता. त्यामुळेच त्यांची हत्या झाली. त्यासंबंधीचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कर्डिले यांनी केला आहे.
दातीर हत्या प्रकरणात कर्डिले यांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. पत्रकार दातीर यांचे राहुरी येथून ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोघा आरोपींना अटक केली आहे. यासंदर्भात बोलताना कर्डिले म्हणाले, राहुरी येथील पठारे नावाच्या शेतकऱ्याचा १८ एकराचा भूखंड होता. या भूखंडावर नगरपालिकेने आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठवले. त्या जागेत आता सोहम ट्रान्सपोर्ट नावाची कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री तनपुरे यांच्याशी संबंधित असून, सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे, तसेच या कंपनीत तनपुरे यांचा सख्खा मेहुणा देशमुख व दातीर हत्याकांडातील फरार आरोपी कान्हू मोरे यांचा मुलगा यशवंत मोरे हे भागीदार आहेत. पठारे कुटुंबीयांनी दातीर यांना या भूखंडासंदर्भात मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर हे कायदेशीर लढाई लढत होते. यासंदर्भातच दातीर यांना आरोपींकडून अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या होत्या, असे कर्डिले यांनी सांगितले. दरम्यान, कर्डिले यांनी केलेल्या आरोपासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, पत्रकार परिषद घेऊनच यासंदर्भात बोलणार आहे.
.................
जमिनीच्या वादातून दातीर हत्याकांड, दोघांना अटक
राहुरी : राहुरी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या ५ नंबर नाक्याजवळील १८ एकरच्या प्लाॅटवरून पत्रकार रोहिदास दातीर यांचा निर्घृण खूण करण्यात आला, अशी माहिती श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिली. ८ एप्रिल रोजी सायंकाळी या घटनेतील आरोपी लाल्या ऊर्फ अर्जुन विक्रम माळी (वय २५, रा. जुने बसस्थानक, एकलव्य वसाहत) याला शेरी चिखलठाण येथून ताब्यात घेतले. ९ एप्रिल रोजी दुसरा आरोपी तौफिक मुक्तार शेख (वय २१, रा. राहुरी फॅक्टरी) याला विंचूर (ता. निफाड, जि. नाशिक) येथून अटक केली. मुख्य सूत्रधार कान्हू गंगाराम मोरे व अक्षय कुलथे हे दोन आरोपी अद्याप पसार आहेत.