घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास साप शिरला होता. पोलिसांना पाहून गुन्हेगारांची भंबेरी उडते. मात्र, चक्क पोलीस ठाण्यात निघालेल्या नागाला पाहून पोलीस दादांचीच भंबेरी उडाली होती. सर्पमित्र दत्तात्रय गाडेकर यांनी या नागाला पकडून निर्सगाच्या सानिध्यात मुक्त केले.मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी काम करीत होते. सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी कैलास परांडे हे काही कामानिमित्त पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांना जवळच असलेल्या जनरेटर जवळून फूस..फूस..असा आवाज येवू लागला. आवाज कसला येतो. हे पाहण्यासाठी परांडे तेथे गेले. त्यावेळी त्यांनी सुमारे चार ते पाच फूट नाग फणा काढून बसल्याचे दिसले. जनरेटरजवळ नाग असल्याचे त्यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सांगितले. या नागाला पाहून पोलीस दादांची भंबेरी उडाली. त्यानंतर नागाला पकडण्यासाठी सर्पमित्राचा शोध सुरू झाला. कुणीतरी संगमनेर तालुक्यातील बोरबन येथील सर्पमित्र दत्तात्रय गाडेकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक पोलिसांना उपलब्ध करून दिला. पोलिसांनी पोलीस ठाण्यात नाग निघाल्याची गाडेकर यांना दिल्यानंतर ते पोलीस ठाण्यात हजर झाले. नागाला पकडल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. पकडलेल्या या नागाला गाडेकर यांनी निर्सगाच्या सानिध्यात मुक्त केले.नागाला पकडताना तेथून तो निघून पोलीस ठाण्याच्या आवारात पडलेल्या एका लोखंडी पाईपमध्ये जाऊन बसला. काठीच्या साह्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न बराच वेळ सुरू होता. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांनी या नागाला पाईपमधून बाहेर काढत सर्पमित्र गाडेकर यांनी पकडले. साप पकडल्यानंतर पोलिसांचा जिवात जीव आला.
घारगाव पोलीस ठाण्यात शिरला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 1:00 PM