सचिन धर्मापुरीकर,कोपरगाव (अहमदनगर) : भांड्याच्या दुकानात कामाला असलेल्या नोकरानेच मालकाच्या घरातून साडेसात तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना शहरातील काले मळा येथे घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी नोकरास ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काले मळा येथील रहिवासी रितेश मदनलाल बडजाते यांचे भांड्याचे दुकान आहे. या दुकानात रूपेश सुनील कोपरे (रा. संजयनगर, कोपरगाव) हा दोन महिन्यांपूर्वी कामाला लागला होता. रितेश बडजाते हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांनी नोकर रूपेश कोपरेला वडील जे काम सांगतील ते करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ८ डिसेंबर रोजी मदनलाल बडजाते यांनी घरी असलेला भांड्याच्या स्टॉकमधून काही भांडी आणण्यास सांगितले. यावेळी घरात त्यांची वयस्कर आई होती. त्यांची नजर चुकवून रूपेशने घरातील साडेसात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. रितेश बडजाते गावाहून परत आल्यावर दि. १४ डिसेंबर रोजी दागिने चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली.
नोकर रूपेश कोपरे यांच्यावर त्यांना संशय आला. त्याच्याकडे विचारणाही केली. परंतु समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी गुरुवारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रूपेश कोपरेविरुद्ध तक्रार केली. संशयित रूपेश सुनील कोपरे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि ३८१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. दारकुंडे हे करीत आहेत.