अकोले : वयाच्या नव्वदीत नाना रघुनाथ गोलवड व त्यांच्या पत्नी भीमाबाई हे तालुक्यातील कोंभाळणे येथील जोडपे जिवापाड जपलेल्या शेतीत राबत काळ्या मातीची सेवा करत आहेत.
कोंभाळणे शिवारात डोंगरकुशीत वसलेल्या टेंभाडे वस्तीवरील हे वयोवृद्ध जोडपे श्रमप्रतिष्ठा जपत आहे. ज्या वयामध्ये लोक घराबाहेर पडत नाहीत, त्या वयामध्ये काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलेल्या शेतामध्ये राबणारी ही जोडी जणू काही काळ्या आईचे पांग फेडत आहे.
कामात राम मानणारे हे दाम्पत्य दरवर्षीप्रमाणे मान्सून सुरू होताच मुलांना शेतीकामास मदत करू लागले आहे. शेतीची प्रचंड आवड असल्याने ते कोणतीही सवड शेतपेरणीच्या कामाच्या वेळी काढत नाहीत.
शेती हेच त्यांचे जीवन चरितार्थाचे साधन आहे. शेतीशी एकनिष्ठ असणे म्हणजे काय, हेच या जोडीने दाखवून दिले आहे. अत्यंत नम्र आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणाऱ्या या जोडीने परिसरातील शेतकऱ्यांची मने जिंकली आहेत.
एकीकडे तरुणांमध्ये शेतीबद्दल आकर्षण उरलेले नाही. शेतामध्ये जाऊन आई - वडिलांना मदत करणारे युवक खूप कमी दिसतात. शेतीपेक्षा टीव्ही, सिनेमा, मोबाईलवर मौजमजा करणाऱ्या तरुणाईपुढे या वृध्द दाम्पत्याने घामाच्या मोलाचा आदर्श ठेवला आहे. अपार मेहनतीने बरड माळरान शेती पिकाखाली आणले आहे. अतिशय कार्यकुशलतेने व नियोजनाने ते आपली शेती फुलवत असतात. रासायनिक खते आणि औषधे यांचा ते बिलकुल वापर करत नाहीत. शेतावर विविध प्रकारच्या पिकांची ते लागवड करतात.
त्यामध्ये भात, नागली, वरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, वालवड, गवार, भेंडी, काकडी, कारली, घोसाळी, दोडका, लाल व दुधी भोपळा, अंबाडी, कारली, खुरसनी, खरबूज अशा नानाविध पिकांची ते लागवड करत असतात. जमीन कमी पण पिके जास्त, अशी बहुपीक पध्दतीची पर्यावरण पूरक त्यांची शेती पाहण्यासारखी आहे.
त्यांचा मुलगा आनंदा व सून फसाबाई यांना बायफ या संस्थेचे मार्गदर्शन लाभले आहे. मुलांच्या मेहनतीला बळ देण्यासाठी या वृध्द दाम्पत्याचे हात राबत आहेत. देश आत्मनिर्भर करण्यासाठीचा जणू काही वस्तूपाठच ते गिरवत आहेत.
.........
लेक-सून रानात राबत्यात. त्यानली आपली इऊलूसी मदत. शेतात काय पेरायचा ह्या पोर बघतो. रोप टाकायला वाफ करण्याची तयारी चालू हाय.
- नाना गोलवड, कोंभाळणे