श्रीगोंदा : महसूल विभागातील उपविभागीय कार्यालयाकडून मिळणारी सेवा जलद गतीने व्हावी यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयातच उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे या पूर्णवेळ थांबणार आहेत. त्यामुळे नागरिकांना उपविभागीय कार्यालयातील कामासाठी नगरला जाण्याची वेळ येणार नाही.
उपविभागीय कार्यालयांतर्गत येणारी
शस्त्र परवाने नूतनीकरण, जातीचे दाखले,
नाॅन क्रिमिलेअर, निराधार व्यक्ती दावे, गौण खनिज दंडात्मक कारवाई दावे ,
जमीन वाद-विवाद दावे आदी कामे श्रीगोंद्यातच होतील. उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणारी सर्व सेवा श्रीगोंदा तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांचे दालनात मिळणार आहेत.
श्रीगोंदा येथे सोमवारी सप्तपदी अभियानही सुरू झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते, पंचायत समिती सभापती गिंताजली पाडळे, अप्पर तहसीलदार चारुशीला पवार, नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, तहसीलदार प्रदीप पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनार्दन सदाफुले यांनी केले.
या अभियानांतर्गत मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ अंतर्गत खालील प्रकरणे मार्गी लागतील. पोटखराबा वर्ग-अ क्षेत्र लागवडीखाली आणणे. गाव नकाशावरील/वहीवाटीचे रस्ते मोकळे करणे. गाव तिथे स्मशानभूमी. तुकडे नियमितीकरण मोहीम. महाआवास घरकुल अतिक्रमण नियमितीकरण. प्रलंबित खंडकरी जमीन वाटप या कामांना चालना देण्यात येणार आहे.
------
मी शेतकऱ्याच कन्या..
मी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शेतकऱ्याचीच मुलगी आहे. माझे वडील शेतकरी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची जाण आहे. शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या प्रश्नांसाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात भेटावे. कायद्याच्या अधीन राहून प्रत्येक प्रश्नास न्याय देण्यासाठी सकारात्मक दृष्टीने कर्तव्य बजावेल, असा विश्वास स्वाती दाभाडे यांनी व्यक्त केला.
फोटो १५ श्रीगोंदा तहसील
श्रीगोंद्यात सप्तपदी अभियानाचा प्रारंभ करताना माजी जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा पाचपुते, स्वाती दाभाडे, गितांजली पाडळे, प्रदीप पवार, चारुशीला पवार व इतर.