अहमदनगर : शहरातील श्री. गणेश विसर्जन आणि मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांसाठी तब्बल बाराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाराच्या ठोक्याला ध्वनिक्षेपक बंद करण्यात येणार आहेत. १५ प्रकारची पथके तैनात करण्यात आली आहेत.सोमवारी(दि.८)अनंत चतुर्दशी आहे. यंदा मानाचे १४ मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. नव्याने कोणत्याही मंडळाला मिरवणुकीत प्रवेश देण्यात आलेला नाही. तब्बल बाराशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांची मिरवणुकीवर करडी नजर असणार आहे. प्रत्येक मानाच्या गणपती मंडळाला एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी देण्यात आलेले आहेत. पेट्रोलिंग, सेक्टर बंदोबस्त,बॅरेकेटिंग, टेहळणी बुरुज (वॉच टॉवर), विनंती पथक, रेड पथक, ध्वनिप्रदूषण पथक तैनात करण्यात आले आहे. बाळाजी बुवा विसर्जन विहीर, यशोदानगर येथील विसर्जन विहीर, सावेडी, केडगाव उपनगरातही पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.शहरातील सर्व धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकी दोन कर्मचारी राहणार आहेत. महिला छेडछाडविरोधी पथकही मिरवणुकीमध्ये गस्त घालणार आहे, असे पोलीस उपअधिक्षक वाय.डी. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बाराशे पोलिसांचा बंदोबस्त
By admin | Published: September 06, 2014 11:58 PM