संगमनेर : राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात आता सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील. महाविद्यालयांमध्ये कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. राज्यात सर्वप्रथम संगमनेरातील शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात येईल. अशी घोषणा महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
बुधवारी (दि.२०) शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात 'युवा हाच दुवा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले, राज्यातील महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याच्या संदर्भाने आठ दिवसातच कार्यवाही करण्यात येईल. येथून पुढे सेतू सुविधा केंद्र सुरू करताना महाविद्यालये, दिव्यांग बांधव आणि एकल महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सामाजिक भूमिकेतून सेतू सुविधा केंद्रांचा उपक्रम राबविण्यात येईल.