कोरोना प्रादुर्भावामुळे २२ मार्च २०२० ला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. या संकटात संगमनेरातील हातावर पोट असणाऱ्या गरजू नागरिकांचे, मंदिरांबाहेर बसणाऱ्या भिक्षेकऱ्यांचे उपासमारीने हाल होऊ नयेत, म्हणून कुटुंब फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना दररोज दोन वेळचे जेवण पुरविले जायचे. रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जायची. कुठलेही शुल्क न घेता जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोहोच दिल्या जात होत्या. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना चहापाणी, नाश्ता, जेवण देखील दिले जायचे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत फाउंडेशनच्या तरुणांची प्रशासनाला मोठी मदत झाली व होते आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढून दुसऱ्या लाटेत परिस्थिती अंत्यत गंभीर बनते आहे. रुग्णांना उपचार मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. संगमनेरातील रुग्णालयांमध्ये स्थानिक व बाहेरगावातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांचे जीव गेले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेकदा त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक जवळ नसतात. यातील काही नागरिक बाहेरगावचे असल्याने त्यांना मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कसे, कुठे करावेत? याबाबत काहीही माहिती नसते. अशावेळी संबंधित रुग्णालयातून फोन आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी फाउंडेशनचे सदस्य शववाहिका घेऊन तेथे पोहोचतात. घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया यांच्याकडून फाउंडेशनच्या तरुणांना पीपीई कीट मोफत दिल्या जातात. कुटुंब फाऊंडेशनच्या तरुणांनी गेल्या वीस दिवसांत ३३ जणांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत.
-----------
हे समजल्यावर हात थरथरायला लागले
कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे आहेत, असा फोन आम्हाला रुग्णालयातून येतो. त्यावेळी आम्ही मृत व्यक्ती कोण आहे, ती कुठली आहे. कोणत्या जाती, धर्माची आहे याबाबत विचारणा करत नाही. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे असते; परंतु एकदा अंत्यसंस्कार करत असताना मृत व्यक्ती आपल्याच वयाची आहे. हे समजल्यावर हात थरथरायला लागले. भीती वाटली, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. असे अंत्यसंस्कारावेळी आलेले अनेक प्रसंग कुटुंब फाउंडेशनचे संस्थापक
प्रतीक जाजू यांनी सांगितले.
--------------
फाउंडेशनचे सदस्य
प्रतीक जाजू, रोहन मुर्तडक, प्रतीक जांभळे, वीरू सामल, सुमित भडकवाड, निखिल घाडगे, प्रतीक चत्तर, अक्षय देशमुख, राहुल नवले, सुयोग जगताप, अक्षय सानप, ओंकार गोडसे, विनायक गुरुडकर, अक्षय वामन हे कुटुंब फाउंडेशनचे तरुण सदस्य अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत आहेत.