अहमदनगर : शिवसेनेचे कोपरगाव उपतालुका प्रमुख सुरेश गिरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार रवींद्र अप्पासाहेब शेटे व विजय बाळासाहेब खर्डे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथून तर त्यांना मदत करणा-या इतर पाच जणांना नाशिक, औरंगाबाद, शिर्डी परिसरातून अटक केली. शेटे हा गेल्या आठ वर्षांपासून फरार होता. गिरे यांची १५ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी भोजडे (ता. कोपरगाव) येथे रवींद्र शेटे व त्याच्या साथीदारांनी गोळ्या झाडत, तसेच कोयत्याने वार करून हत्या केली होती. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने १८ मार्च रोजी नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव वलटे, आकाश मोहन गिरी यांना अटक केली. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शेटे व खर्डे हे मात्र फरार होते. हे दोघे धुळे येथे लपले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती़. माहितीनुसार पथकाने धुळे येथे जाऊन दोघांना अटक केली. हत्याकांडात आरोपींना पळून जाण्यास मदत करणारे अमोल सोपानराव मते (रा़ दुर्गानगर, वैजापूर), साईनाथ वाल्मिक मते (रा़ पारेगाव येवला), रवींद्र जालिंदर मगर(वय २५ रा.संवत्सर, कोपरगाव), लोकेश राय्यप्पा मुद्दापूर (वय २६ रा़चाकण जि़ पुणे), सुनील पंढरीनाथ नागवे (वय २९ रा़सोमठाण जि़ जालना) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़ प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरीक्षक देशमुख, गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार नानेकर, हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब मुळिक, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डिले, राम माळी, शंकर चौधरी, संतोष लोढे, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, रविकिरण सोनटक्के आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पॅरोल रजेवरील आरोपीचाही सहभाग रवींद्र शेटे व मयत सुरेश गिरे यांच्यात पूर्ववैमनस्यातून अनेकदा भांडणे झाली. सन २०१२ मध्ये रवींद्र शेटे व त्याच्या साथीदारांनी सुरेश गिरे यांचा मित्र बंटी उर्फ विरेश पुंजाहरी शिनगर याचा खून केला होता. या गुन्ह्यात रवींद्र शेटे याचा भाऊ किरण शेटे याला जन्मठेपेची शिक्षा झालेली असून काही दिवसांपूर्वी त्याला येरवडा कारागृहातून पॅरोल रजा मिळाली होती. किरण याचाही गिरे यांच्या हत्याकांडात सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
गिरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधारासह सात जेरबंद; आठ वर्षांपासून होता आरोपी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 2:57 PM