निंबळक (ता. नगर) येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील ८० टक्के नागरिक, महिला नोकरीनिमित्त एमआयडीसी येथील कारखान्यात कामाला जात आहेत. एमआयडीसी परिसरातील गावे, नगर शहरातून जवळपास २५ ते ३० हजार कामगार कामाला येतात. यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. निंबळक येथे कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कोरोना समिती व ग्रामपंचायतने बारा तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. दवाखाने, मेडिकल २४ तास तर दूध डेअरी सकाळी दोन तास चालू राहणार आहे. बाकी सर्व दुकाने बंद राहणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.
एमआयडीसी येथील पोलीस प्रशासनाने दोन, तीन वेळेस पेट्रोलिंग करावी, विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर योग्य कार्यवाही करावी, दंड करावा, तसेच नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, स्वतःची काळजी घ्यावी, कोरोनाची लक्षणे जाणवल्यास तत्काळ विलगीकरण कक्षात किंवा कोविड सेंटरला जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन सरपंच लामखडे यांनी केले आहे.