पळवे : शेतकऱ्यासह सात शेळ्यांचा जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत वाहक तारांमध्ये अडकून विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वादळासह पाऊस येण्याचे वातावरण तयार झाल्याने शेतकरी शेळ्या घेऊन घराकडे चालला होता. पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. दामोदर पाचरणे (वय ६५, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
दामोदर पाचरणे हे नेहमीप्रमाणे शनिवारी तेरा शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास पावसाचे वातावरण तयार झाले होते. वाराही सुटायला लागला होता. त्यामुळे पाचरणे हे शेळ्या घेऊन घराकडे निघाले होते. तेथून गेलेल्या एका विद्युत वाहिनीच्या विद्युतप्रवाह सुरू असलेल्या तारा जमिनीवर पडल्या होत्या. विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारांमध्ये शेळ्या अडकल्या. शेळ्या अचानक तडफडू का लागल्या हे पाहण्यासाठी पाचरणे गेले. त्यांनी शेळ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला व त्यांनाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. हा प्रकार पाहून त्या शेतकऱ्याचा मुलगा व नातू त्यांना वाचविण्यासाठी धावले. मात्र त्याचवेळी शेजारीच असलेले पोपट पाचारणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या दोघांना तेथे जाण्यापासून रोखले. तत्काळ वीज वितरणाशी संपर्क करून विद्युतपुरवठा बंद केला. त्यानंतर मदत कार्य सुरू झाले. तोपर्यंत सात शेळ्यांसह दामोदर पाचरणे यांचा मृत्यू झाला.
---
दोन तासांनी पोहोचले महावितरण कर्मचारी
विजेचा धक्का बसून शेतकऱ्यासह शेळ्यांचा मृत्यू झाल्यावर तब्बल दोन तासांनी महावितरण व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करण्यात आला. पंचानामा करून दुपारी चारच्या सुमारास पाचारणे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर येथे नेण्यात आला.