अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील परदेशात अडकलेले सात नागरिक सोमवारी नगरमध्ये परतले आहेत. आरोग्य तपासणीनंतर त्यांना नगर शहरातील हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नगर जिल्ह्यातील अनेकजण परदेशात अडकलेले आहेत. परदेशातील नागरिकांना भारतात आणण्यासाठी सरकारने विमान सेवा सुरू केली आहे. पहिल्या दिवशी नगर शहरातील लंडनमध्ये अडकलेल्या दोघांना नगरमध्ये आणण्यात आले आहे. सिंगापूरमध्ये सात जण अडकले होते. ते सोमवारी नगरमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी तिघे जण इतर जिल्ह्यांमध्ये गेले आहेत. उर्वरित तीन जण नगर शहरात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील दोघे जण मनालीमध्ये अडकले होते. ते नगरमध्ये पोहोचले आहेत. परदेशातून आलेल्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. महापालिकेने परदेशातून आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी येथील तीन हॉटेल अधीग्रहीत केले आहे. नगर जिल्ह्यातील परदेशात अडकलेल्यांना नगरमध्ये आणून क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यातील परदेशात अडकलेल्यांना नगर शहरात आणून त्यांना हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. आतापर्यंत सात जण परदेशातून आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. हॉटेलमधील सर्व खर्च संबंधितांनी करायचा आहे़, असे महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सांगितले.