लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत, तर ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेल्या सहा हजार जणांच्या दाखल केलेल्या अर्जांची आता पडताळणी होणार आहे. अशा एकूण सात हजार अर्जांवर सध्या काम सुरू असून कमी मनुष्यबळाअभावी जात पडताळणी समिती कार्यालयाची ओढाताण सुरू आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे़ उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यक असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्डकॉपी सादर करावी लागते. सीईटी सेलकडून जात पडताळणी समितीला १ हजार १५० अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत ५२१ विद्यार्थ्यांना जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र दिले आहे, तर १५३ अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्रुटी दूर करण्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आला आहे. ४५६ विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्यांचा पावती क्रमांक, मोबाईल क्रमांक, एज्युकेशन आयडी सापडत नाही. तसेच त्या अर्जांमध्ये चुकीची माहिती असल्याने अशा विद्यार्थ्यांच्या पडताळणी प्रमाणपत्रावर निर्णय घेणे अशक्य झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीकडे संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त अमिना शेख यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-------------
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या अर्जांची चौकशी होणार
जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित सदस्यांना केवळ पावती देण्यात आली होती. आता ते निवडून आल्याने त्यांना सहा महिन्याच्या आत जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक असणार आहे. अशा निवडून आलेल्या सदस्यांचे तब्बल ६ हजार ४६७ प्रकरणे दाखल आहेत. त्यामध्ये १२०० प्रकरणे ऑनलाईन तर उर्वरित ऑफलाईन आहेत. काही अर्जांबाबत तक्रारी, काहींनी बोगस पुरावे दिले असण्याची शक्यता आहे. अशा अर्जांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. निवडून आलेल्यांना आता त्यांचा जात पडताळणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यानंतर त्यांचा प्रस्ताव निकाली काढण्यात येणार आहे. तसेच दक्षता पथकांद्वारेही सदस्यांच्या अर्जांची चौकशी होणार आहे.
----------------
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त
नगर जिल्हा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे. त्यामुळे जात पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होतात. मात्र नगर येथील जात पडताळणीसाठी अधिकाऱ्यांसह १३ जण कार्यरत आहेत. त्यापैकी ५ कर्मचारी कंत्राटी आहेत. आणखी तीन पदांसाठी बार्टीकडे मागणी करण्यात आली आहे. प्रकरणांची संख्या व मनुष्यबळ याचा मेळ कठीण असल्याचे शेख यांनी सांगितले.
--------