शिर्डी विधानसभा विश्लेषण/दिलीप चोखर / प्रमोद आहेर । राहाता : शिर्डी मतदारसंघात विकासाचे राजकारण करीत राधाकृष्ण विखे यांनी सातव्यांदा विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत त्यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला. राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला राम राम करीत भाजपात प्रवेश केला होता. मागील विधानसभेच्या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा आणि अभय शेळके या विरोधकांना सोबत घेतले. मताच्या बेरजेचे राजकारण व केलेल्या विकासांच्या जोरावर मागील निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मते मिळवली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी चुलत बंधू सुरेश थोरात यांना विखेंविरोधात मैदानात उतरवले होते. शिर्डी मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील थोरात यांचे वर्चस्व होते. मात्र मतांमधून ते जाणवले नाही. साईबाबांचा आशीर्वाद आहे. दिवंगत बाळासाहेब विखे यांचे आमच्यावर उपकार आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के नेतृत्व करीत असताना सामाजिक व जातीय सलोखा राखला. हा वारसा आम्ही पुढे कायम चालू ठेवल्याने जनता आमच्यासोबत आहे. महायुतीच्या परिश्रमाचा हा विजय आहे. विजय मी जनतेला समर्पित करतो. राज्यात प्रत्येक मतदारसंघात युतीच्या उमेदवांराची चांगली परिस्थिती होती, परंतु काही मतदारसंघातउमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. १२-० बाबत त्यांनी नंतरच बोलू, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. शिर्डीत प्रथमच कमळ फुललेशिर्डी मतदारसंघातून वाढत्या मताधिक्याने सातव्यांदा आमदार होत राधाकृष्ण विखे यांनी मतदार संघावरील आपली एकहाती सत्ता शाबूत ठेवली आहे़ विशेष म्हणजे विखेंच्या रूपाने शिर्डीत प्रथमच कमळ फुलले आहे. विखे यांनी तालुक्यात केलेली विकास कामे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील व खासदार डॉ़ सुजय विखे पाटील यांच्या रूपाने असलेले भक्कम हेल्पिंग हॅन्ड, भाजपात गेल्यामुळे सेना-भाजपाची मिळालेली साथ, शेवटच्या घटकापर्यंत असलेले कार्यकर्त्यांचे जाळे, जुन्या-नव्यांनी हातात हात घालून केलेले काम, सुनियोजित प्रचार यंत्रणा, तालुक्यातील कमकुवत झालेला विरोधक व विरोधात ऐनवेळी आलेला नवखा उमेदवार यामुळे विखे यांचा विजय केवळ सोपा नाही तर मतांचा डोंगर रचणारा ठरला़ विखे यांनी मंत्री पदाबरोबरच विरोधी पक्षनेते पदी असतांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या सलगीतून केलेल्या कामांनी विजय सुकर झाला़ सुरेश थोरात या नवख्या उमेदवाराला ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीने विखे यांच्या मताधिक्यात वाढ झाली़ तरीही काँग्रेसच्या व विखेंच्या परंपरागत विरोधकांनी थोरात यांच्या हाताला साथ दिल्याने त्यांनी पंचेचाळीस हजारांचा टप्पा ओलांडला़ वंचित आघाडीचे विशाल कोळगे ५७८८ मते मिळवून तिसºया क्रमांकावर राहिले तर बसपाच्या सिमोन जगताप यांना १०४३ मते मिळाली़ दीड हजाराहून अधिक नागरिकांनी नोटाचे बटन दाबून सर्वच उमेदवारांबद्दल आपली नापसंती व्यक्त केली़े
विखेंची आमदारकीची सप्तपदी; सर्वाधिक मतांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 2:20 PM