अहमदनगर : दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था, मदतनीस, विशेष मदतनीस, ब्रेल लिपीची आवश्यकता असलेल्या मतदारांना आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत.त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात दिव्यांग व्यक्तींसाठी एकूण १७९७ व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर सुलभ प्रक्रियेचा लाभ घेऊन दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या १३ हजार ४४८ एवढी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधिर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी पुढाकार घेतला आहे.दिव्यांगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने १२ विधानसभा मतदारसंघात कार्यरत मतदान केंद्रावर १ हजार ७९७ व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधित माहिती उपलब्ध होण्यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या शाळांमधून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर मार्गदर्शक म्हणून नेमण्यात येणार आहे. अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दिव्यांग मतदारांची एकूण संख्या : १३ हजार ४४८व्हिलचेअरची आवश्यकता असलेले मतदार : १ हजार ७९७वाहतूक सुविधा आवश्यक असलेले मतदार : १ हजार ७०१मतदनीस,सहायकाची आवश्यकता असलेले मतदार : २ हजार ५२७विशेष मतदनीस, सहायकाची आवश्यकता असलेले मतदार : १ हजार ३१४ब्रेल लिपीची आवश्यकता असलेले मतदार : १ हजार ५२३
दिव्यांग मतदारांसाठी अठराशे व्हिलचेअर :जिल्ह्यात साडेतेरा हजार दिव्यांग मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:54 AM