केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा जेऊर समन्वय समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
जेऊरच्या महावितरण कार्यालयात सावळा गोंधळ सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. वारंवार तक्रार, मागण्या करूनही त्याची दखल घेतली जात नाही. कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याने शेतकरी व नागरिकांची पिळवणूक होत आहे. त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा जेऊर समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
जेऊर महावितरण कंपनी ते केडगाव विद्युत वाहिनी दुरुस्त करणे. पर्यायी व्यवस्था म्हणून पांढरी पूल येथून विद्युत पुरवठा जोडण्यात यावा. जेऊर येथील कनिष्ठ अभियंत्याची बदली करण्यात यावी. कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक करावे. शेटे वस्तीवरील रोहित्र इमामपूर लाईनला जोडावे. रोहित्रांवरील ओव्हरलोडची पाहणी करून वाढीव रोहित्र तत्काळ बसविण्यात यावेत. जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्त कराव्यात. वीज बिलांची दुरुस्ती जेऊर कार्यालयातच व्हावी. ग्राहकांना विद्युत साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. जेऊर पाणी पुरवठ्याची वाहिनी दुरुस्त करावी, अशा विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदनावर भाजप तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, उपाध्यक्ष राजेंद्र दारकुंडे, जेऊरच्या सरपंच राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, बहिरवाडीच्या सरपंच अंजना येवले, ससेवाडीचे सरपंच दत्तात्रय जरे, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, धनगरवाडीच्या सरपंच शुभांगी शिकारे, सागर भोपे, माजी सरपंच कैलास पटारे, राजेंद्र ससे, अंबादास पवार, विकास म्हस्के, बापू दारकुंडे यांच्या सह्या आहेत.