अहमदनगर : नेवासा मतदारसंघातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी काँगे्रसने पाठिंबा जाहीर केला आहे़ त्यामुळे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंपुढील आव्हान वाढले आहे़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गडाख हे राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार होते़ मात्र, राष्ट्रवादीतील काहींनी मुरकुटे यांना मदत केली़ त्यामुळे गडाख यांचा पराभव झाला होता़ ही बाब गडाखांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली होती़ तेव्हापासून गडाख राष्ट्रवादीत नाराज होते़ त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली़ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नेवाशात चांगले यशही मिळविले़ नेवासा पंचायत समितीतही क्रांतिकारी शेतकरी पक्षाची सत्ता आहे़ विधानसभा निवडणुकीत गडाख यांनी अपक्ष अर्ज भरला आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार, अशी चर्चा रंगली होती़ राष्ट्रवादी, भाजप व गडाख अशी तिरंगी लढत नेवाशात रंगणार असल्याच्या चर्चा होत्या़ या तिरंगी लढतीमुळे मुरकुटेंना निवडणूक सोपी होईल, अशी अटकळ मतदारसंघात बांधली जात होती़ मात्र, आता राष्ट्रवादी काँगे्रसने उमेदवार न देता गडाखांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे़ नेवाशात राष्ट्रवादीने शंकरराव गडाख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष पूर्ण ताकदीनिशी गडाखांच्या पाठिशी उभा राहणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.
नेवाशात शंकरराव गडाखांना राष्ट्रवादीची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 1:08 PM