नेवासा विधानसभा निवडणूक विश्लेषण - सुहास पठाडे । नेवासा : नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली.मुरकुटे-गडाख यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होईल असा अंदाज होता. मात्र सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची मोठी फळी, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग यांची मिळालेली साथ यामुळे गडाखांनी मुरकुटेंचा सहज पराभव केला.सतरा उमेदवार रिंगणात असूनही येथे सुरुवातीपासूनच गडाख-मुरकुटे यांच्यातच खरी लढत होती. गडाख यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न स्वीकारता अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. येथे राष्टÑवादीने उमेदवार न देता गडाखांना पाठिंबा दिला. घुले बंधंूंनी त्यांची ताकद गडाख यांच्या पाठीशी उभी केली. त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतल्या. तालुक्यातील पाटपाण्याच्या कोलमडलेल्या नियोजनाचा मुद्दा गडाख यांनी प्रचारात प्रामुख्याने उचलला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात मोठी प्रचार यंत्रणा उभी केली. मोठ्या सभा घेण्याऐवजी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला होता. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते प्रशांत गडाख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, उदयन गडाख यांनी गडाख यांच्या प्रचाराची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. प्रशांत गडाख यांनी सोशल मीडियावर विकासाच्या मुद्यावर केलेली ‘आमदार मुरकुटे उत्तर द्या’ ही ‘वेबसिरीज’ प्रभावी ठरली. २०१४ च्या निवडणुकीतील चूक सुधारण्यासाठी गडाख अगदी सुरुवातीपासूनच अलर्ट राहिले.मुरकुटे यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा वगळता भाजपच्या सर्व नेत्यांनी मुरकुटे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मुरकुटे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. मात्र त्याचाही काहीच फायदा झाला नाही. बेलपिंपळगाव, कुकाणा, भेंडा या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गटातच मुरकुटेंना मताधिक्य मिळवता आले नाही. या गटात गडाख यांनी मोठी प्रचार यंत्रणा राबविली. सोनई, खरवंडी, चांदा हे गट गडाखांचे बलस्थान आहेत. त्यात गडाखांनाच आघाडी मिळाली. पहिल्या फेरीपासूनच गडाख यांनी आघाडीत कायम राखत शेवटच्या फेरी अखेर ३० हजार ६६३ मतांनी विजय संपादन केला.
माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. सर्वप्रथम जनतेचे व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. गेल्या पाच वर्षात खूप त्रास झाला. मात्र ते सर्व विसरलो आहे. कार्यकर्त्यांनीही संकुचित वृत्ती न ठेवता मोठ्या मनाने झाले गेले विसरून जावे. मिळालेल्या संधीचा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी फायदा घेणार आहे. माझ्या राजकीय जीवनातील ही अतिशय अटीतटीची निवडणूक होती. त्यात यश मिळाल्याने समाधानी आहे, असे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.