अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचं चिन्ह दिसत नाही. अनेक बडे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करत असताना पवारांचे नातलग माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हेदेखील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता बळावली आहे. अशातच आज श्रीरामपूर येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला कधीही न पाहिलेल्या पवारांचे रौद्ररुप समोर आलं.
पत्रकार परिषद सुरू असताना शरद पवार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी पवारांनी पत्रकाराला प्रतिप्रश्न केला. पक्षाचे नेते पक्ष सोडून जात असताना आता नातेवाईकही पक्ष सोडतायेत या प्रश्नावर शरद पवार भडकले. नातेवाईकांचा आणि ह्याचा काय संबंध? असा प्रतिप्रश्न पवारांनी पत्रकाराला केला. तुम्ही नातेवाईकाचा का विषय काढता? हे चुकीचं बोलताय असं सांगत शरद पवार पत्रकार परिषदेतून उठले.
शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू असताना घडलेल्या या प्रसंगाने सगळेच अवाक् झाल्याचं पाहायला मिळालं. राजकारणात नातेवाईकांचा संबंध आहे का? हे असं बोलायचं असेल तर मला बोलायचं नाही असं सांगत पवार जागेवरून उठले त्यानंतर इतर पत्रकारांच्या सांगण्यानंतर शरद पवार पुन्हा जागेवर बसले. त्यावेळी अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही, यांना बोलवणार असाल तर मला बोलावू नका, आपण निघून गेलात तर बरं होईल असा शब्दात पवारांनी आपला राग व्यक्त केला.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीतून अनेक नेते पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामागोमाग चित्रा वाघ, मधुकर पिचड, संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड अशा अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे तर सातारचे खासदार उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटील, राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. तर छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादीला अनेक धक्के सहन करावे लागत आहे.