अहमदनगर: राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट) पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दसऱ्याच्या आधी जाहीरपणे इकडे प्रवेश केल्यास त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी देऊ, असे खुले आव्हानच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत लंके यांना दिले. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.
आमदार लंके हे शरद पवार यांना मानतात. ते इकडेच येतील. त्यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी पारनेरचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी केली. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, की त्यांना यायचे असेल, तर त्यांनी दसऱ्याआधी उघडपणे प्रवेश करावा. आमदार लंके यांनी जाहीरपणे प्रवेश केल्यास त्यांना अगामी लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफुट झाली. आमदार लंके यांनी सुरुवातीला भूमिका स्पष्ट केली नव्हती. शेवटच्या टप्प्यात ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी आमदार लंके यांचेच नाव चर्चेत होते. परंतु, ते अजित पवार गटात गेल्याने त्यांच्या नावाची चर्चा थांबली. राष्ट्रवादीकडून इतर उमेदवारांची चाचपणी सुरू असून, आमदार लंके आल्यास त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.