जामखेड (अहमदनगर) : ‘रोहित दादांना उमेदवारी द्या, ते निवडून येतील,’ अशी मागणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार हसत ‘तुझी मागणी झाली’ असं रोहित पवार यांना म्हणाले.सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्यात दुष्काळी दौ-यावर जात असताना जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या निवासस्थानी काही वेळ थांबून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बीड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग सोनवणे, बाळासाहेब आजबे, मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सतिश शिंदे, माजी जि. प. अध्यक्ष शिवाजी राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, शरद भोरे, विश्वनाथ राऊत, कांतीलाल वाळूंजकर, नगरसेवक पवनराजे राळेभात, डिगांबर चव्हाण, अमित जाधव, लक्ष्मण ढेपे, प्रकाश काळे, ऊमर कुरेशी, अकबर तांबोळी, चंद्रशेखर नरसाळे, अजय कोठारी आदी उपस्थित होते.
जामखेड शहराला २० ते २२ दिवसांनी पिण्यासाठी नळावाटे पाणी पुरवठा होतो. मात्र, तेही पाणी अस्वच्छ असते, अशा तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या़ त्यावर तुम्ही पुरावे द्या,पुढचे मी पाहतो, असे सांगत पवारांनी जामखेडचा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.कोठारी यांच्या घरातून निघाल्यानंतर गाडीत बसलेल्या शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या उमेदवारीची मागणी केली़ त्यावेळी रोहित पवारही मागे बसलेले होते़ कार्यकर्त्यांची मागणीनंतर रोहितकडे पाहत ‘तुझी मागणी मान्य झाली, असे हसत हसत शरद पवार म्हणाले.