अहमदनगर: शरद पवार यांनी लंके यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधानाला आपण फारसे महत्व देत नाही, असे सांगत खोट बोलणे हा पवारांचा धंदाच झाला आहे. खोट बोलपण रेटून बोल, अशी त्यांची अवस्था आहे, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर लोणी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना केली. तसेच त्यांनी पवार यांच्यामुळेच अहमदनगर जिल्ह्याची अधोगती झाली आहे, असा आरोप केला आहे. आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, म्हणून महसूलमंत्र्यांनी निरोप पाठवला होता, असा गोप्यस्फोट शरद पवार यांनी शुक्रवारी नगरमधील गांधी मैदानात झालेल्या सभेत केला होता. त्याला पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शरद पवार यांच्या विधानाला मी फारसे महत्व देत नाही. कारण खोट बालणे हा त्यांचा धंदाच झाला आहे. तसेच पवार यांनी विखे आता कुठे आहेत, असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला होता.
यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असताना विखे पाटील म्हणाले, पवारांच्या धोरणात कुठे सातत्य आहे. कधी पाहाटे शपथविधी घ्यायला सांगतात, तर कधी भजपाला पाठींबा देऊ काढून घेतात. काँग्रेसमध्ये विदेशी मुद्यावरून ज्यांच्याशी फारकत घेतली, त्यांच्याच पायाशी जाऊन बसयाचे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील सगळे त्यांना सोडून गेले असून, पवार यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र होते. मात्र पवार यांनी नेत्यांमध्ये भांडणे लावली. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी, उद्योग, हे प्रश्न प्रलंबित असून, जिल्ह्याची पिच्छेहाट झाली आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.