मुंबई - राज्यात मराठा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही आरक्षणाच्या मुद्द्यांवरून भाजप आक्रमक झाला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत टोला लगावला. त्यामुळे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थोरातांवर टीका केली. मात्र, पडळकर यांनी वापरलेली भाषा न रुचल्याने शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले.
"महसूलमंत्रीपदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले आहेत. मूळात देवेंद्र फडणवीस यांचे लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षाअगोदरच झाले आहे, याचेही भान यांना राहिले नाही," असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी थोरातांना ट्विटर अकाऊंटवरुन टोला लगावला होता. त्यानंतर, मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आणि अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी पडळकर यांना संस्कारी भाषेत टोला लगावला.
पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, असे ट्विट शरयू यांनी केलं आहे. भाजपा आमदाराने आपल्या वडिलांवर केलेली टीका न पटल्याने शरयू देशमुख यांनी ट्विटरवरुनच पडळकर यांना प्रत्यु्त्तर देताना संस्कार शिकवले आहेत.
फडणवीसांची घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे तुम्ही फार गांभीर्याने घेतले आहे. ते म्हणाले होते की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू. मात्र, तसे झाले नाही. सत्तेसाठी काहीही बोलायचे, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. सामान्यांना फसवणे आणि सत्ता मिळवणे हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र, त्यानंतर काय झाले आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका थोरात यांनी केली.
काय म्हणाले होते फडणवीस?
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी नागपुरात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं आहे, पण आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.