स्वस्त की फस्त धान्य?
रोहित टेके ।
कोपरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने रेशन दुकानातील बायोमेट्रिक पद्धतीनुसार रेशन कार्ड धारकाचे हाताच्या बोटांचे ठसे घेणे बंद केले आहे. प्रत्येक कार्ड धारकाला रेशन देण्यासाठी दुकान चालकाच्या किंवा दुकानातील सेल्समनच्या हाताच्या बोटांचे ठसे देऊन परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रेशनच्या धान्याचा काळा बाजार करण्याच्या वाटा मोकळ््या झाल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यात एकूण शहरासह ७९ गावे आहेत. यात २ लाख ९ हजार ३५२ इतके कार्डधारक लाभार्थी आहेत. त्यांना धान्य वाटप करण्यासाठी ११३ परवाने धारक रेशन दुकान आहेत. यामध्ये महिला बचत गटाकडे २१, पुरुष बचत गटाकडे १, व्यक्तिगत ३३ तर सहकारी संस्थाकडे ५८ अश्या स्वरूपात रेशन दुकानचे परवाने देण्यात आलेले आहेत. या माध्यमातून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना यांच्या माध्यमातून ४ हजार १२१ क्विंटल तांदूळ तर ६ हजार ९९० इतका गहू व फक्त अंत्योदयसाठी ६०. ७१ क्विंटल साखर प्रत्येक महिन्याला वाटप करण्यात येते.
सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सर्वच लाभार्थ्यांना १० हजार २८२ क्विंटल तांदूळ व ४११.३७ क्विंटल डाळीचे मोफत वाटप केले जात आहे.
रेशन वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धत आमलात आणली होती. रेशनच्या धान्याचा काळाबाजारास आळा घालणे हाच शासनाचा उद्देश होता. परंतु सध्या कोरोनाचे संकट आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातील कार्डधारकांचे बोटाचे ठसे न टेकवता त्यांना धान्य वाटप करण्यात येत आहे.
वाटप करीत असताना १०० टक्के वाटप पूर्ण करण्याच्या प्रशासनाच्या दुकान चालकांना सूचना असतात. बहुसंख्य कार्डधारक हे रेशन दुकानातून त्यांना मिळणारे धान्य नेत नाहीत. परंतु कोरोनामुळे दुकान चालकाकडेच अधिकार आल्याने यातून रेशनच्या धान्याचा काळा बाजार होऊ शकतो?
रेशनचा तांदूळ काळ्या बाजारातरेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवणूक केलेल्या एका दुकान चालकावर एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच फौजदारी गुन्हा दाखल करून त्याच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
कोपरगावात सर्वत्र रेशन दुकानातील धान्याचा पुरवठा सुरळीत सुरु आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर मशीनमध्ये धान्य नेल्याची नोंद असेल आणि त्याला धान्य मिळाले नाही, अशी तक्रार आल्यास संबंधित दुकान चालकावर कारवाई करण्यात येईल. - योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव
कोरोनामुळे आम्ही धास्तावलो आहे. कारण नियमित रेशनचे वाटप झाल्यानंतर मोफत धान्याचे वाटप करावे लागते. यासाठी सतत दुकान उघडे ठेवावे लागते. त्यामुळे लोकांचा परत परत संपर्क येतो. मोफत धान्य वाटपाचा कोणत्याच प्रकारचा मोबदला दुकानचालकांना मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून दुकान चालकांना तत्काळ विमा संरक्षण मिळावे.
- जनार्दन जगताप, उपाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, कोपरगाव तालुका