महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ
प्रथम तिला वंदन करते आहे. खरं तर महिला दिन ८ मार्च रोजी असतो. परंतु तिचे दररोज गुणगाण गावे अशी माझी आई. शहरापासून जवळच राहणारी. पाच भावंडे आणि दोन बहिणी असा परिवार. परिवारात सर्वांची ती लाडकी. तिला सर्वजण अक्का म्हणत. ती माझी लाडकी आई. लंकाबाई धिवर.
पूर्वी वयात आल्यानंतर मुलीचे लग्न केले जायचे. ती १६ वर्षांची असतानाच तिचे लग्न झाले. सर्व बहीण-भाऊ, आई-वडिलांची लाडकी, गुणी धैर्यवान कन्या लग्न होऊन उंबरठा ओलांडून सासरी आली. कसे बसे एक वर्ष निघून गेले आणि माझ्या वडिलांच्या थोरल्या बंधूंना देवाज्ञा झाली. या घटनेचा वडिलांना मानसिक धक्का बसला. ते मानसिक रुग्ण झाले. घरावर मोठे संकट आले होते. आई त्यांची सेवा-शुश्रूशा करू लागली. त्यामुळे त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. पुढे आम्हा तीन मुलींचा जन्म झाला. तिने मुलाची अपेक्षाही केली नाही. माझ्या मुलीच मला मुलासमान अशी तिची धारणा. मुलगा नसल्याची तिने कधीही खंत केली नाही. पती व आम्हा तीन मुलींचा सांभाळ आईने मोठ्या जिद्दीने केला. त्याचवेळी आमच्या मामा-मावशी यांनीही मोलाची साथ दिली. मुलींना शिक्षित बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा निश्चय तिने केला. त्यासाठी तिने काम शोधायला सुरुवात केली. नोकरीसाठी खूप वनवन हिंडावे लागले. लग्न लवकर झाल्यामुळे व शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी मिळणेही अवघड झाले होते. पण तिने हिंमत हारली नाही. तिने प्रयत्न सोडले नाहीत. तिच्या प्रयत्नांपुढे सर्व संकटे, अडथळे निखळून पडले अन् तिला समाजकल्याण विभागाच्या शासकीय मुलांचे वसतिगृह या ठिकाणी नोकरी मिळाली. नोकरीसाठी निवड तर झाली होती. नोकरीही चांगली होती. परंतु तीन मुली, त्याही लहान. त्यांना घेऊन परगावी राहायचे मोठे कठीण होते. यापूर्वी कधीही बाहेरगावी जाण्याचा प्रसंग आला नव्हता. आता तिला मुली घेऊन बाहेरगावी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रहावे लागणार होते. माझे मोठे मामा आणि काका यांनी आईला खूप सहकार्य केले. परगावी राहण्यासाठी आईने हिंमत बांधली. अवघ्या २५ व्या वर्षी आई आम्हा तीन मुलींना घेऊन शासकीय वसतिगृहात स्वयंपाकीण (कूक) म्हणून नोकरीत रुजू झाली. त्यावेळी स्वयंपाकगृहात स्टोव्ह किंवा गॅसचे साधन नव्हते. चुलीवरच सर्व स्वयंपाक असायचा. पावसाळ्यात सरपण ओले असले की चुलीच्या धुरामुळे अक्षरश: तिचे डोळे रक्त ओकायचे. अशा अवस्थेत तिला दिवसभरात ४०० ते ५०० पोळ्या लाटाव्या लागत. संध्याकाळ झाली की आपली पिलं आपली वाट पाहत असतील, त्यांनाही भूक लागली असेल या काळजीने ती घराकडे निघायची. रात्रं-रात्रं जागून घर काम करून मुलींचा अभ्यास घ्यायची. मुलींना तिने कधीही वडिलांची उणीव भासू दिली नाही. मुली १० वी व १२ वीच्या परीक्षेला निघाल्या तरी आई कामावर असायची. तरीही तिचे सर्व लक्ष मुलींकडे असायचे. मुलींना पेपर कसा जाईल, या विचारात ती असायची. मुलींसाठी तिने स्वत:च्या भावना जाळून टाकल्या. ज्या वयात सजून-धजून मिरवायचे दिवस होते, त्या वयात तिला अग्निच्या धगधगत्या वणव्याजवळ बसून चटके सहन करावे लागले. काबाडकष्ट करावे लागले. परंतु तीने न डगमगता मुलींना उच्चशिक्षित केले. आज तिच्या तीनही मुली उच्च पदावर पोहोचलेल्या आहेत. म्हणूनच सलाम माझ्या मातेच्या धैर्याला आणि कष्टाला.
आई ही शिक्षित असो किंवा अशिक्षित, जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही.
- मनिषा भिंगारदिवे
०६ लंकाबाई धिवर