कोतूळ : येथील गणपती मंदिराच्या मागे नंदा नावाची पस्तीस वर्षांची विवाहित मनोरुग्ण वीस दिवसांपासून आग ओकणाऱ्या उन्हात उभी आहे. कित्येक दिवसांचे सडके अन्न आणि गटारातील पाणी पिऊन जणू ती मरणच मागत आहे. सासर व माहेर कोतूळ परिसरात असतानाही तिच्या यातना कोणी समजून घेत नाही, हे तिचे दुर्दैव आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात नंदा नावाची पस्तीस वर्षांची विवाहित कोतुळात आली. कोतूळ परिसरातील पळसुंदे गावातील असल्याचे ती सांगते. तिला गावातील लोकांनी कपडे, जेवण दिले. त्यावर ती वर्षभर रेशन दुकान, मुख्य चौक, दत्त मंदिर या परिसरात रस्त्यावर राहू लागली.
गेल्या वीस-पंचवीस दिवसांत कोरोना रुग्ण वाढल्याने व त्यात लाॅकडाऊनचे कडक नियम असल्याने तिच्याजवळ कोणी जात नाही. तिने वरदविनायक गणेश मंदिराच्या आवारात आपले बस्तान मांडले आहे. भर उन्हात ती दिवसभर उभीच असते.
नंदा माझं नाव आहे, मी दहावी शिकली आहे. माझी बाळं मला द्या, असे ती बडबडते. तिला दोन मुले, पती, आई-वडील, नातेवाईक असा परिवार असल्याचे ती सांगते.
पंधरा-वीस दिवसांपूर्वी लोकांनी दिलेल्या भाकरी व अन्न कुजून गेले आहे. त्याची आजूबाजूला दुर्गंधी पसरली; परंतु तेच अन्न ती खाते आणि बाजूला गटारातील पाणी पिते. कोरोना आजाराच्या भयाने कोणी तिच्या जवळही जात नाही. दोन दिवसांपासून तिला चालताही येत नाही.
जणू मरण देगा देवा असेच तिला वाटत असावे.
एकीकडे आई,वडील, पती, नातेवाईकही जवळ करेनात, तर दुसरीकडे मतपेट्या, देवाधर्माच्या नावावर समाजसेवेचा दिखावा करणाऱ्यांनीही तिच्याकडे पाठ फिरवलीय का? नंदाच्या वेदना कुणी समजून घेईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-------
फोटो - ०७कोतूळ मनोरुग्ण.
नंदा नावाची पस्तीस वर्षांची मनोरुग्ण महिला गेल्या अनेक दिवसांपासून कोतूळमध्ये आहे.