कोपरगाव : मुलगी विवाहित असतानाही अविवाहित असल्याचे सांगून मंदिरात लग्न लावून देऊन त्या बदल्यात ३ लाख ५० हजार रुपये घेऊन दहेगाव बोलका (ता. कोपरगाव) येथील तरुणाच्या फसवणुकीचा प्रकार घडला. तरुणाच्या फिर्यादीवरून मध्यस्थी असलेल्या बारा जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी किशोर अंबादास मिसाळ (रा. दहिगाव बोलका, ता. कोपरगाव) याने फिर्याद दिली. शंकर रामकिसन मंचरे, छबुबाई शंकर मंचरे, आबासाहेब कोरडे, भानुदास किसन चोरमारे (चौघे रा. डावखरवाडी, ता. पैठण, जि. औरंगाबाद), अर्चना गोपीनाथ भोजने, गोपीनाथ भाऊसाहेब भोजने, भाऊसाहेब भोजने (तिघे रा. जारवकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), परमेश्वर गाडे (रा. बोधेगाव, ता .शेवगाव), कविता बाळू बाहुले, हिराबाई रहाटवाड, योगिता रहाटवाड ( रा. सातारा गाव, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अर्चना गोपीनाथ भोजने ही अगोदरच विवाहित होती. ही माहिती किशोर मिसाळपासून लपविण्यात आली. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी वरील आरोपींनी अर्चना भोजने हिचे किशोर मिसाळ यांच्याशी उक्कडगाव, ता. कोपरगाव येथील देवीच्या मंदिरात लग्न लावून दिले. त्याबदल्यात लग्नाच्या खर्चासह एकूण ३ लाख ५० हजार रूपये घेतले. त्यानंतर काही दिवसांनी फसवणूक झालेली असतानाही प्रकरण मिटविण्यासाठी १ लाख रुपयांची खंडणी मागितली व न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे मिसाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अर्चना हिने दि.२५ फेब्रुवारी २०१९ रोजी दहिगाव बोलका येथील राहत्या घरातून १६ हजार रूपये, दोन मोबाईल संच, वाहनाच्या चाव्या चोरून नेल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष शेळके करीत आहेत.
मुलगी अविवाहित असल्याचे सांगून लावले लग्न : तरुणाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:46 AM