घारगाव : घारगाव (ता. संगमनेर) येथील अकलापूर रस्त्यालगत मकाच्या शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. यात मेंढपाळ मीराबाई भास्कर लोहटे (रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर) या किरकोळ जखमी झाल्या.
घारगाव येथील प्रगतशील शेतकरी सुभाष शिवाजी आहेर यांच्या मकाच्या शेतात मेंढपाळांचा मेंढ्यांसह रात्रीचा मुक्काम होता.रविवारी पहाटे बिबट्याने येथे मेंढ्यांच्या बाजूला झोपलेल्या मेंढपाळांच्या कुटुंबातील महिलेच्या डाव्या पायाला पंजा मारून ओढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सर्वजण उठल्याने बिबट्या पळून गेला. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वनविभागाचे वनरक्षक श्रीकिसन सातपुते यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सदर महिलेला लस देण्यासाठी घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. अनेकदा बिबट्यांचे दर्शन
घारगाव येथील अकलापूर रस्ता परिसरात दुचाकी चालकांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. वनविभागाने पाहणी करून बिबट बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.