शेवगाव (अ.भा. मराठी बालकुमार साहित्य नगरी) : पाठ्य पुस्तकातील सर्व लेखक, कवींनी सोमवारी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत आपल्या कविताही सादर केल्या. या कवितांनी विद्यार्थ्यांसह रसिकही मंत्रमुग्ध झाले होते.शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये आयोजित बालकुमार साहित्य संमेलनात किशोर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘साहित्यिक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी भरत दौंकर यांनी केले. दासू वैद्य यांनी ‘ऐन रस्त्यावरचा खांब। मला म्हणाला थांब। कॉम कॉम डॉट कॉम। नेट नेट इंटरनेट।’ या कविता सादर केल्या. किशोर पाठक यांनी ‘इवली इवली माझी बाहुली। माज्या एवढी तिची सावली।’ 'हत्ती पळतो तुरुतुरु। हरीण चाले हळूहळू’ या कविता सादर केल्या. आश्लेषा महाजन यांनी‘इंद्रधनुचे रंग वेगळे। तरीही त्याची एक कमान’ ही कविता सादर केली. आबा महाजन यांनी ‘आपलं बुवा झकास असतं। डोक्याला अभ्यासचं टेन्शनच नसतं।’ ही कविता सादर केली. दादासाहेब कोते यांनी एकदा अचानक आभाळ रुसलं। ढगांचा बुरखा ओढून बसलं। ही कविता सादर केली. तुकाराम धांडे यानी ‘रानफुला’ ही कविता सादर केली.आपल्याला कविता कशा सुचतात? कवितेचा किंवा धड्याचा अभ्यासक्रमात कसा समावेश होतो? कविता कशी सादर करावी? याबद्दल उपस्थित लेखक, कवींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शेवगाव बालकुमार साहित्य संमेलन : पाठ्यपुस्तकातील लेखक, कवींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 3:31 PM