अनिल साठे ।
शेवगाव : शहरातील गेवराई रस्त्यावरील आनंद निवास व मुलींच्या वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीलगत शेवगाव नगरपरिषदेकडून गावातील कचरा टाकला जात आहे. परिणामी, वसतिगृहातील निराधार, अनाथ मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा कचरा तत्काळ हटविण्यासाठी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना सूचना केल्या आहेत. आनंद वसतिगृह १९७२ सालापासून अनाथ व निराधार मुलींचा सांभाळ करत आहे. वसतिगृहात ६५ अनाथ मुली व त्यांचा सांभाळ करणाºया महिला राहत आहेत. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने या वसतिगृहालगत आणून टाकलेल्या कचºयामुळे तेथील मुलींच्या आरोग्याचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना नेहमीच मलेरिया, ताप, जुलाब अशा घातक आजारांना सामोरे जावे लागते.
परिणामी त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान व आरोग्य अभियान’ असे उपक्रम राबवत आहे. दुसरीकडे नगरपरिषद प्रशासन निराधार मुलींच्या जीविताशी खेळते आहे.
संस्थेच्या अध्यक्षा सिस्टर आयरिन यांनी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर घुलेंनी तत्काळ मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना संपर्क साधून कचरा तेथून उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या गंभीर प्रश्नांवर डॉ. घुले, तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याशी वसतिगृह प्रशासनाने या विषयावर चर्चा केली. त्याचबरोबर क्षितीज घुले युवा मंचाचे रोहित काथवटे, संतोष जाधव, किरण भोकरे, प्रवीण बारस्कर, दिलीप कांबळे, कृष्णा सातपुते, सचिन शिनगारे, साई पटेल यांच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन दिले. कचरा टाकण्याच्या जागेत बदल झाला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.